भाजप नेतृत्त्वाच्या वैचारिक गोंधळावर चिंतन करण्याची गरज

Foto
‘चंपा’ ने केली ‘कमळी’ची पंचायत
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी काल ‘शिवसेने बरोबर जाण्याची’ तयारी दाखवित स्वतः बरोबरच पक्षाची सुद्धा चांगलीच गोची केली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्परता दाखवित सारवासारव करण्याचा प्रयत्न केला खरा पण ‘बुंद से गई वो हौद से’ कशी येणार?  
विशेष म्हणजे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी प्रदेश पदाधिकार्‍यांची बैठक घेऊन राज्यातील महाविकास आघाडी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेण्याचे आदेश नुकतेच दिले आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर चंद्रकांतदादाचे हे वक्‍तव्य बालिशपणाचे म्हटले पाहिजे. 
खरे तर चंद्रकांत पाटील नावाचे हे कोल्हापुरी व्यक्‍तीमत्त्व प्रदेशाध्यक्षपदी विराजमान होणे हाच चमत्कार आहे. महाराष्ट्राला त्यांच्या राजकीय पार्श्‍वभूमीची काहीही माहिती नसताना तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी त्यांना उचलले आणि थेट प्रदेशाध्यक्ष करून टाकले.  अचानक आंबा पडल्यासारखे पक्षात ते रातोरात मोठे झाले. असे सांगतात की, अमित शहा यांची सासुरवाडी कोल्हापूर आहे. ती ओळख चंद्रकांतदादांना राज्यातील भाजपची ‘पाटीलकी’ देऊन केली. 
चंद्रकांत पाटील यांच्याकडे युतीच्या सत्तेत सार्वजनिक बांधकाम सारखे महत्त्वाचे खाते होते. या खात्यावरही त्यांनी प्रभाव पाडल्याचे दिसले नाही. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना त्यांच्या ‘पुरातन’ बंगल्यात सहजासहजी प्रवेश करता येत नव्हता, असे कार्यकर्ते सांगतात आणि तरीही चंद्रकात पाटील प्रदेशाध्यक्ष पदावर कायम आहेत. गंमत म्हणजे गुजरातच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांचीच नियुक्‍ती झाली आहे. अर्थात हे चंद्रकांत पाटील नवसारीचे खासदार आहेत, ही बाब वेगळी. परंतु भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्त्वाला चंद्रकांत पाटील या नावाचे आकर्षण असावे, असे दिसते. अपेक्षेप्रमाणे प्रदेशाध्यक्ष पाटलांच्या वक्‍तव्याचा शिवसेनेने तिसर्‍या हुकमापर्यंत समाचार घेतला. 
राजकीय दृष्ट्या अतिशय बालिशपणा चंद्रकांत पाटलांनी काल केला. त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते व हितचिंतक कमालीचे दुखावले आहेत आणि त्याच बरोबर पक्षाचे सुद्धा मोठी बदनामी झाली आहे. राज्यातील भाजप नेतृत्त्वाच्या वैचारिक गोंधळावर एखादे राष्ट्रीय चिंतन ‘रामभाऊ म्हाळगी’ मध्ये होण्याची गरज मात्र यानिमित्ताने दिसून आली आहे.